सविता राजपूत यांना इंग्रजी विषयात पीएचडी पदवी प्रदान
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी; कुटुंब आणि मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
तालुक्यातील सावदा येथील सविता कर्तारसिंग राजपूत यांनी इंग्रजी विषयात केलेल्या संशोधनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (पीएचडी) पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सविता राजपूत यांनी पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातील डॉ. स्वप्ना व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयातील संशोधन पूर्ण केले. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी पीएचडीसारखी सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या सविता यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि शिक्षणाचा सुरेख समन्वय साधला. एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सीईटी तसेच पीएचडीपर्यंतचा शैक्षणिक प्रवास त्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर पूर्ण केला.
सविता राजपूत या युवा उद्योजक भगवान नामदेव राजपूत यांचे लहान बंधू कर्तारसिंग राजपूत यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशात कुटुंबीय तसेच संशोधन मार्गदर्शकांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
सविता राजपूत यांचे हे यश विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरले असून, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणाची जिद्द आणि मेहनत असेल तर यशाचे शिखर गाठता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
