Spread the love

योगेश परदेशी यांची बांद्रा उपविभागात डेप्युटी इंजिनिअरपदी पदोन्नती

२३ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेला मिळाले यश; वाडे गावासह भडगाव तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव

भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

भडगाव तालुक्यातील वाडे येथील रहिवासी श्री. योगेश नामदेव परदेशी यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील बांद्रा उपविभाग, मुंबई येथे उपअभियंता (डेप्युटी इंजिनिअर) पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आमदार किशोर पाटील यांच्यासह परिसरातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

योगेश परदेशी यांची १० सप्टेंबर २०२३ रोजी कनिष्ठ अभियंता म्हणून शासकीय सेवेत निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी शाखा अभियंता म्हणूनही जबाबदारी सांभाळली. यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २००६ मध्ये त्यांची सहाय्यक अभियंता श्रेणी-२ म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सिंचन विभागात निवड झाली होती.

आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात योगेश परदेशी यांनी मुंबई बांधकाम मंडळ, चेंबूर येथील बहुमजली इमारत बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १, ठाणे तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भिवंडी आदी विविध ठिकाणी जबाबदारी पार पाडली आहे.

सुमारे २३ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेत प्रामाणिकपणा, परिश्रम आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बांद्रा उपविभागात उपअभियंता पदावर पदोन्नती मिळाली आहे.

योगेश परदेशी यांच्या पदोन्नतीबद्दल परदेशी राजपूत समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडू परदेशी यांच्यासह समाजबांधवांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या या यशामुळे वाडे गावासह भडगाव तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कार्याचा आदर्श युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version