Spread the love

ईद-ए-मिलादुन्नबीला महाराष्ट्रात ‘ड्राय डे’ घोषित करा!

२६ ऑगस्टला दारू व मादक पदार्थांची विक्री बंद ठेवण्याची दानिश शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मलकापूर | प्रतिनिधी :
पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबीच्या दिवशी २६ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘ड्राय डे’ घोषित करावा, अशी जोरदार मागणी AIMIM बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ईद-ए-मिलादुन्नबी हा धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी राज्यभरात दारू तसेच इतर मादक पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. मद्यविक्रीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

नशामुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृतीची मागणी

केवळ मद्यविक्री बंद ठेवण्यापुरता निर्णय मर्यादित न ठेवता सामाजिक सौहार्द, शांतता, बंधुभाव आणि नशामुक्तीसाठी राज्यभर व्यापक जनजागृती अभियान राबवावे, अशी मागणी दानिश शेख यांनी केली. ईद-ए-मिलादुन्नबीचा दिवस शांतता, सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश देणारा ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

निवेदन देताना अब्दुल रहमान, शेख तालिब, शेख इसाक, शेख तनवीर, शेख इमरान, शेख इरशाद, रेहानुद्दीन, अब्दुल वाजिद, दानिश शेख, शेख रेहान, शेख वसीम यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

दरम्यान, ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या मागणीवर राज्य शासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version