Spread the love

सावदा पोलिसांची धडक कारवाई; गहाळ झालेले १ लाख ४९ हजारांचे मोबाईल हस्तगत

CEIR पोर्टलच्या मदतीने तांत्रिक तपास; विविध ठिकाणांहून ७ मोबाईल शोधण्यात यश

सावदा । प्रतिनिधी । अक्षय वाघ

सावदा पोलीस ठाणे हद्दीत विविध कारणांनी गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यात सावदा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तब्बल १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सात मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. यामध्ये VIVO, Realme, Redmi, Motorola तसेच Apple कंपनीच्या iPhone मोबाईलचा समावेश आहे.

सावदा पोलीस ठाण्यात मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गहाळ नोंद वहीतील मोबाईलची माहिती संकलित केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर संबंधित मोबाईलचे IMEI क्रमांक टाकून तांत्रिक पद्धतीने तपास सुरू करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषणातून मोबाईल विविध ठिकाणी वापरात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा माग काढत भुसावळ, जळगाव जिल्ह्यासह इतर ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत केले.

हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विलास कोळी (रा. वाघोदा खु.) यांचा २० हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल, कमलाकर पाटील (रा. रोझोदा) यांचा २० हजार रुपये किमतीचा Realme मोबाईल, तर विनोद जगन्नाथ वाघ (रा. वाघोदा बु.) यांचा १२ हजार रुपये किमतीचा Redmi मोबाईलचा समावेश आहे.

याशिवाय शेख फरहान शेख इरफान (रा. फैजपूर) यांचा १२ हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईल आणि प्रशांत जावळे (रा. कळमोदा) यांचा १० हजार रुपये किमतीचा Motorola मोबाईल पोलिसांनी शोधून काढला आहे.

तसेच वाकोला पोलीस ठाणे, मुंबई येथील प्रॉपर्टी मिसिंग नोंदीतील सुमारे १५ हजार रुपये किमतीचा VIVO मोबाईलही सावदा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याशिवाय Apple कंपनीचे दोन iPhone, सुमारे ६० हजार रुपये किमतीचे, पोलिसांच्या हाती लागले आहेत.

या कारवाईमुळे मोबाईल हरविलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, तांत्रिक तपासाच्या माध्यमातून गहाळ मोबाईल शोधण्याची पोलिसांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलच्या मूळ मालकांची खातरजमा करून ते संबंधितांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करून मोबाईल शोधण्याची ही कारवाई सावदा पोलिसांच्या तांत्रिक तपासातील महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version