Spread the love

गावठी कट्टा बाळगणारा तरुण रावेर पोलिसांच्या जाळ्यात

बसस्थानक परिसरातून २५ हजारांचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त

रावेर प्रतिनिधी | अक्षय वाघ

रावेर : शहरातील बसस्थानकाच्या मागील परिसरात गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या २० वर्षीय तरुणाला रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी करण्यात आली.

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, रावेर बसस्थानकाच्या मागे छोरीया मार्केटजवळ एक तरुण शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी गुन्हे शोध पथकाने परिसरात पाहणी केली असता छोरीया मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणारा तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला.

पोलिसांनी त्याला थांबवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा तसेच एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव कृष्णा दत्तू पाटील (वय २०, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर) असे सांगितले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३ सह २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्र कोठून आणले? पोलिसांचा तपास सुरू

आरोपीने गावठी कट्टा व काडतुसे कोठून मिळविली, ती कोणत्या उद्देशाने खरेदी केली तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत रावेर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील व संभाजी यांनी केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version