Spread the love

सिल्लोड येथे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी प्रशिक्षण व चिंतन शिबिर उत्साहात

संघटन बळकटीकरण, बुद्ध विहारांचे सक्षमीकरण व धम्मप्रसारावर मार्गदर्शन

सोयगाव प्रतिनिधी | शिवराम जाधव |

सिल्लोड : येथील नालंदा बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व चिंतन शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात संघटनेची पुढील वाटचाल, कार्यकर्त्यांची भूमिका आणि धम्मप्रसाराच्या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिरासाठी सोयगाव तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात संघटनेची कार्यपद्धती अधिक प्रभावी करणे, बुद्ध विहारांचे सक्षमीकरण, धम्माचा प्रचार व प्रसार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्य गावागावांत पोहोचविण्यासंदर्भात सखोल चिंतन करण्यात आले.

यावेळी आयु. डॉ. राजाराम बर्गे सर आणि आयु. किशोर जोहरे सर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व धम्मविषयक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

शिबिराच्या माध्यमातून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्याची दिशा मिळाली असून, आगामी काळात भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अधिक प्रभावीपणे गावागावांत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version