Spread the love

प्राचीन गंगेश्वर महादेव मंदिराबाहेर कचऱ्याचे साम्राज्य; स्वच्छता यंत्रणेचा बोजवारा!

गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास; भाविक त्रस्त, लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे सवाल

मलकापूर | प्रतिनिधी

मलकापूर शहरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन गंगेश्वर महादेव मंदिराबाहेरील अस्वच्छतेने स्वच्छता व्यवस्थेची पोलखोल झाल्याचे चित्र आहे. मंदिराच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला असून, हा कचरा गटारीत गेल्याने गटारी तुंबल्या आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

देवाच्या दारात कचरा; नगरपरिषदेची स्वच्छता यंत्रणा कुठे?

दररोज भाविकांची आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या मंदिर परिसरात प्लास्टिकच्या पिशव्या, कागद आणि इतर घनकचरा साचलेला दिसत आहे. हा कचरा गटारीत गेल्याने पाण्याचा निचरा बंद झाला असून परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

धार्मिक स्थळाच्या अगदी बाहेरील परिसरातच अशी अस्वच्छता असेल, तर शहरातील इतर भागांतील स्वच्छतेची अवस्था काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकप्रतिनिधींच्या प्रभागातच अस्वच्छता?

मंदिराबाहेर कचऱ्याचे ढीग आणि तुंबलेल्या गटारी दिसत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी या परिसराची पाहणी केली का? संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या सूचना दिल्या का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची निवड केली जाते. त्यामुळे आपल्या प्रभागातील समस्यांकडे नियमित लक्ष देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागाचे लक्ष कुठे?

साचलेला घनकचरा, तुंबलेल्या गटारी आणि दुर्गंधी ही केवळ अस्वच्छतेची बाब नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे. अशा ठिकाणी नियमित पाहणी करून तातडीने साफसफाई होणे अपेक्षित आहे. मात्र परिस्थिती कायम राहिल्याने नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्वच्छता सभापतींनी रस्त्यावर उतरून पाहणी करावी

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने कार्यालयीन कागदोपत्री आढाव्याऐवजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रत्येक प्रभागाची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रमुख धार्मिक स्थळाबाहेरच घनकचरा साचत असेल, गटारी तुंबलेल्या असतील आणि दुर्गंधीचा त्रास होत असेल, तर स्वच्छता व्यवस्थेच्या दाव्यांची प्रत्यक्षात पोलखोल होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

नागरिकांचीही जबाबदारी; मात्र प्रशासनही जबाबदारीपासून मुक्त नाही

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. मात्र नियमित कचरा संकलन, कचऱ्याची उचल, जनजागृती आणि गटारींची वेळोवेळी पूर्ण साफसफाई करणे ही प्रशासनाचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.

आता आश्वासन नको; प्रत्यक्ष स्वच्छता हवी!

गंगेश्वर महादेव मंदिराबाहेरील घनकचरा तातडीने हटवावा, तुंबलेल्या गटारींची साफसफाई करावी आणि परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी भाविक व नागरिकांकडून होत आहे.

‘महादेवाच्या मंदिराबाहेर कचरा, तुंबलेल्या गटारी आणि दुर्गंधीचा त्रास असेल, तर लोकप्रतिनिधी, आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता विभाग नेमका कोणत्या स्वच्छतेचा आढावा घेत आहेत?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आता बैठका, आश्वासने आणि कागदी कारवाई नको; मंदिर परिसर प्रत्यक्ष स्वच्छ करून दाखवा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version