Spread the love

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिताताई वाघ यांची पाहणी

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; शेतकरी व ग्रामस्थांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

तारखेडा प्रतिनिधी :
तारखेडा परिसरातील रेल्वे गेट तसेच शेतकऱ्यांसाठी वापरला जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने निर्माण झालेल्या समस्येची खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. नागरिक व शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या मार्गाला पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तारखेडा परिसरातील रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांनी आमदार किशोरआप्पा पाटील यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली होती. रेल्वे प्रशासनाने शेतकरी व नागरिकांकडून नियमितपणे वापरला जाणारा रस्ता अचानक बंद केल्याने परिसरात नाराजी निर्माण झाली होती. या समस्येची गंभीर दखल घेत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी खासदार स्मिताताई वाघ यांच्याशी संपर्क साधून प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र (राजू दादा) पाटील यांनीही खासदार स्मिताताई वाघ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून रेल्वे मार्गावरील अडचणी तसेच ग्रामस्थांच्या विविध मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांत खासदार वाघ यांनी तारखेडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

पाहणीदरम्यान खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे मार्गालगतच्या विविध ठिकाणी जाऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ज्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने रस्ता बंद केला आहे, त्या ठिकाणी शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पाचोरा स्थानकावर अधिक रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजू दादा पाटील यांनी पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्ये वाढ करण्याबरोबरच अधिक रेल्वे गाड्यांना पाचोरा येथे थांबा देण्याची मागणी खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे केली.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विदर्भ एक्स्प्रेसला पाचोरा येथे थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच इतर प्रवासी सुविधा व मागण्यांसाठीही टप्प्याटप्प्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन खासदार वाघ यांनी दिले.

अपघातातील मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन

पाहणीनंतर खासदार स्मिताताई वाघ यांनी काही दिवसांपूर्वी तारखेडा येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तालुकाप्रमुख राजू दादा पाटील यांच्या चुलत पुतण्याच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.

या पाहणीवेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, नंदू बापू पाटील, गणेश पाटील वाघुळखेडा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत वाघ, शिवसेना शाखाप्रमुख धनराज पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, आनंदा पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, शरद पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी व ग्रामस्थांच्या दैनंदिन वाहतुकीचा प्रश्न तातडीने मार्गी लागणार का, याकडे आता तारखेडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version