न्हावी ग्रामसभेत नागरिकांचा रोष; रस्ते, गटारी व बससेवेच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक
मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून प्रशासनाला जाब; १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळाल्याने कामे मार्गी लावण्याचे सरपंचांचे आश्वासन
यावल | विशेष प्रतिनिधी – हर्षल पाटील :
यावल तालुक्यातील न्हावी येथे ग्रामपंचायत सरपंच देवेंद्र चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत गावातील विविध मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत आपल्या समस्या मांडल्या. रस्ते, गटारी, मोकाट कुत्र्यांचा वाढता वावर तसेच बससेवेच्या प्रश्नावरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.
रस्ते, गटारी आणि बससेवेवरून संताप
ग्रामसभेत नागरिकांनी गावातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी साचलेले पाणी व तुंबलेल्या गटारी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गावात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारही करण्यात आली.
तसेच विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ-न्हावी बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. नागरी सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निधीअभावी विकासकामे रखडल्याचे सरपंचांचे स्पष्टीकरण
ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरपंच देवेंद्र चोपडे यांनी नागरिकांची समजूत काढत विकासकामे रखडण्यामागील कारणे स्पष्ट केली. १५व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यास झालेला विलंब आणि काही तांत्रिक अडचणींमुळे गावातील विकासकामे रखडली, त्यामुळे काही ठिकाणी नागरी सुविधांची दुरवस्था निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या विशेष प्रयत्नांतून आता १५व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाल्याचे सरपंचांनी ग्रामसभेत नमूद केले. उपलब्ध निधीतून गावातील रस्त्यांची डागडुजी, गटारींची स्वच्छता तसेच इतर आवश्यक नागरी कामे प्राधान्याने हाती घेण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
सरपंचांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचा रोष काहीसा शांत झाला. मात्र, प्रत्यक्ष कामांना कधी सुरुवात होते आणि रखडलेल्या नागरी समस्या किती लवकर मार्गी लागतात, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
