Spread the love

गिरणा पंपिंग रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री पाच घरे फोडली

एकदंत रेसिडेन्सी व साई पार्क परिसरात खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडून तपास सुरू

पाचोरा | भुवनेश दुसाने :
पाचोरा शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरातील एकदंत रेसिडेन्सी व साई पार्क भागात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एकाच लाईनीतील तब्बल पाच घरे फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकाच रांगेतील पाच घरे लक्ष्य

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर या परिसरातील घरांना लक्ष्य केले. एकाच रांगेतील तब्बल पाच घरांचे दरवाजे अथवा कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

मात्र, चोरट्यांच्या हाती धुपाटणे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित घरांमधून नेमका किती ऐवज चोरीला गेला किंवा चोरीचा प्रयत्न कितपत यशस्वी झाला, याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विविध दिशेने तपास सुरू केला आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

एकाच रात्री एकाच परिसरातील पाच घरे फोडण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी तसेच या घटनेतील चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version