Spread the love

‘राजमाता जिजाऊ’ बस लोकार्पण सोहळा भाजप- महायुतीने हायजॅक केला; अतुल पाटील यांचा घणाघाती आरोप

लोकनियुक्त नगराध्यक्षांना डावलल्याचा आरोप; शासकीय कार्यक्रमाला राजकीय रंग दिल्याने यावलमध्ये राजकीय वातावरण तापले

यावल | प्रतिनिधी : हर्षल पाटील :
यावल नगरपरिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बस लोकार्पण सोहळ्यावरून स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. शासकीय व प्रशासकीय स्वरूपाचा असलेला हा कार्यक्रम भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी ‘हायजॅक’ करून त्याला राजकीय स्वरूप दिल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केला आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्षांना डावलल्याचा आरोप

‘राजमाता जिजाऊ’ बस लोकार्पण सोहळ्याच्या आयोजनात यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना योग्य तो मान-सन्मान देण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरील उपस्थिती आणि नियोजनात नगराध्यक्षांना डावलण्यात आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना योग्य स्थान मिळणे अपेक्षित असताना त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप या निमित्ताने करण्यात आला आहे.

‘लोकार्पण शासकीय, श्रेय भाजपचे?’

या प्रकारावर माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. शासकीय खर्चातून आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमाचे श्रेय राजकीय पक्षांकडून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“कार्यक्रम शासकीय खर्चातून आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून होत असताना भाजप व महायुतीचे नेते त्याचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना डावलून राजकीय वर्चस्व दाखविणे हा लोकशाहीचा अपमान आहे,” असा घणाघाती सवाल अतुल पाटील यांनी उपस्थित केला.

यावलमध्ये राजकीय वातावरण तापले

‘राजमाता जिजाऊ’ बस लोकार्पण सोहळ्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे यावल शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनात लोकप्रतिनिधींना दिलेले स्थान, कार्यक्रमाचे राजकीयीकरण आणि श्रेयवाद यावरून शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत भाजप अथवा महायुतीच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची भूमिका समोर आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतरच या वादाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version