ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकतेसाठी ‘टीम समर्पण फाउंडेशन’चे निवेदन
ग्रामसेवकांच्या उपस्थितीसाठी GPS व बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
सोयगाव | प्रतिनिधी :
ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासह ग्रामसेवक व संबंधित अधिकारी गावात वेळेवर उपस्थित राहावेत, यासाठी शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी **‘टीम समर्पण फाउंडेशन’**च्या वतीने करण्यात आली. याबाबत सोमवारी, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यमुलवाड यांना निवेदन देण्यात आले.
गावाच्या विकासासाठी प्रशासनाची कार्यक्षमता, वेळेवर उपस्थिती आणि पारदर्शक कारभार अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामविकास विभागाने ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी GPS व बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, सोयगाव तालुक्यात या निर्देशांची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होत आहे, असा सवाल फाउंडेशनच्या वतीने उपस्थित करण्यात आला.
बायोमेट्रिक हजेरीबाबत प्रशासनाने खुलासा करावा
सोयगाव तालुक्यात नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध असताना ग्रामसेवक व अधिकाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात कोणती प्रशासकीय अथवा तांत्रिक अडचण आहे, याचा प्रशासनाने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
ग्रामपंचायतीतील कर्मचारी व अधिकारी कार्यालयीन वेळेत नियमितपणे उपस्थित राहिल्यास नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, विविध दाखले, विकासकामांशी संबंधित माहिती तसेच अन्य प्रशासकीय सेवा वेळेत मिळण्यास मदत होईल. त्यामुळे GPS व बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तातडीने आणि सक्तीने लागू करावी, अशी आग्रही मागणी ‘टीम समर्पण फाउंडेशन’ने केली.
पारदर्शक कारभारासाठी लढा सुरूच ठेवणार
ग्रामस्थांच्या हक्कांचे संरक्षण, प्रशासनातील पारदर्शकता आणि गावांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या शासकीय निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. नागरिकांना प्रशासनाकडून वेळेत आणि योग्य सेवा मिळाव्यात, यासाठी ‘टीम समर्पण फाउंडेशन’चा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
