Spread the love

अकलूदच्या तापी नदीकाठच्या घरावर फैजपूर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

बनावट ग्राहक पाठवून कारवाई; वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

यावल | प्रतिनिधी : अक्षय वाघ

यावल तालुक्यातील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी असलेल्या दुमजली घरात कथितरीत्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर फैजपूर पोलिसांनी गुरुवारी, दि. २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली असून, सदर व्यवसाय चालविणाऱ्या संशयित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूद येथील मनीषा प्रकाश झोपे (वय ४५) ही महिला संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. प्रथम बनावट ग्राहक संबंधित ठिकाणी पाठवून माहितीची खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलीस पथकाने दुमजली घरावर छापा टाकला.

छाप्यादरम्यान घरामध्ये वेश्याव्यवसायासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली. त्यापैकी तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील असून सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य एक महिला भुसावळ येथीलच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी कुंटणखाना चालविल्याच्या आरोपावरून मनीषा झोपे हिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, फैजपूर पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालय, यावल पोलीस ठाणे, फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रमेश पाटील, निंभोरा पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version