Spread the love

रिंगणगाव बाजारपेठेत गटारीचे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; ‘ग्रामसेवक धूमकेतूसारखे उगवतात’ म्हणत ग्रामस्थांचा संताप, तातडीने स्वच्छतेची मागणी

एरंडोल तालुका ग्रामीण प्रतिनिधी :
रिंगणगाव येथील बाजारपेठ परिसरात गटारीचे दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी रस्त्यावर साचत असल्याने ग्रामस्थांसह भाजीपाला विक्रेते व व्यापाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्यासह विविध आजारांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

बाजारपेठेत सांडपाणी; नागरिक त्रस्त

गावातील बाजारपेठ हा नागरिकांची मोठी वर्दळ असलेला परिसर आहे. याच ठिकाणी गटारीचे दूषित पाणी साचत असल्याने नागरिकांना त्यातून मार्ग काढावा लागत आहे. भाजीपाला विक्रेते आणि ग्राहकांनाही या अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्याची नियमित विल्हेवाट न लावल्याने दुर्गंधी आणि डासांचा त्रास वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीने तातडीने गटारींची स्वच्छता करून सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

‘ग्रामसेवक धूमकेतूसारखे उगवतात’

ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीची यंत्रणा नियमितपणे कार्यरत असणे अपेक्षित असताना नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी वारंवार ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची नाराजी आहे.

ग्रामसेवक नियमितपणे ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नसून धूमकेतूसारखे अधूनमधून उगवतात, अशी उपरोधिक तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रशासकाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त असतानाही गावातील स्वच्छता, गटारींची देखभाल आणि नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत प्रभावी कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. ‘प्रशासकही नावालाच’ असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गावातील मूलभूत सुविधा आणि दैनंदिन समस्या सोडविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठ प्रशासनाने चौकशी करावी

बाजारपेठेसारख्या वर्दळीच्या ठिकाणी सांडपाणी साचूनही त्यावर तातडीने उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठ प्रशासनाने रिंगणगाव ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पाहणी करून ग्रामसेवक नियमित उपस्थित राहतात का, प्रशासकांकडून प्रभावी नियंत्रण ठेवले जाते का आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते का, याची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

‘मूलभूत सुविधांची वाट लागली’

ग्रामस्थ भरत महाजन यांनी सांगितले की, “गावात प्रशासक पद नुसते नावालाच असल्याने तसेच ग्रामसेवक अधूनमधून एखाद्या धूमकेतूसारखे उगवत असल्याने गावातील मूलभूत सुविधांची वाट लागली आहे. बाजारपेठेसह काही रहिवासी भागांत अस्वच्छता पसरली असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ पातळीवरून याची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी.”

ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने विलंब न करता गटारींची स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा आणि परिसराची नियमित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version