Spread the love

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत सहा महत्त्वपूर्ण विषयांवर विधी सहाय्यक किशोर डोंगरे यांचे मार्गदर्शन

लोहारा, ता. पाचोरा | प्रतिनिधी : ईश्वर खरे

ग्रामीण भागातील नागरिकांना कायदेविषयक माहिती मिळावी, त्यांच्या मूलभूत व संविधानिक हक्कांची जाणीव व्हावी तसेच गरजू नागरिकांना उपलब्ध असलेल्या विधी सेवा आणि विविध योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, पाचोरा आणि श्री तपेश्वर ज्येष्ठ नागरिक मंडळ, लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ज्येष्ठ नागरिक अभ्यासिका हॉल, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, लोहारा येथे हे शिबिर पार पडले. पाचोरा न्यायालयातील विधी सहाय्यक किशोर डोंगरे यांनी उपस्थितांना विविध कायदेविषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

सहा महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन

शिबिरात राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, वैकल्पिक वाद निवारण पद्धती (ADR) व त्याचे फायदे, मानसिक आजार व बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी NALSA Legal Services Scheme, 2024, मानव-वन्यजीव संघर्षातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी NALSA Scheme, 2025 तसेच गरिबी निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी NALSA Scheme, 2015 या सहा महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

विधी सहाय्यक किशोर डोंगरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार, नागरिकांची घटनात्मक कर्तव्ये तसेच न्यायालयीन प्रक्रिया टाळून परस्पर सामोपचाराने वाद सोडविण्यासाठी असलेल्या ADR पद्धतीचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांना उपलब्ध असलेल्या मोफत विधी सहाय्याच्या सुविधांचीही माहिती दिली.

‘कायदेशीर हक्कांची जाणीव असणे आवश्यक’

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कायदेशीर हक्कांविषयी जागरूक राहणे आवश्यक असून, कोणत्याही कायदेशीर अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध विधी सेवा यंत्रणेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत कायदेविषयक माहिती पोहोचविण्यासाठी अशा जनजागृती शिबिरांची सातत्याने गरज असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.

तपेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कार्यक्रमाला तपेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबीकर, सचिव बाबुलाल बोऱसे, बाबुलाल सुतार, प्रभाकर चौधरी, ईश्वर परदेशी, अ. अ. पटेल, अमृत चौधरी, श्रावण चौधरी, मंगलदास मोरे, अॅड. एस. एस. गीते, रमेश पालीवाल, ज्ञानेश्वर राजपूत, कडुबा चौधरी, आशा काळे, चंद्रकला भडके, चंद्रभागा चौधरी, श्रीराम कलाल यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक कार्यकर्ते अभिमान बाविस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कलाल यांनी केले.

‘न्याय सर्वांसाठी’चा संदेश

तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कायदेविषयक जनजागृती करून नागरिकांना त्यांच्या हक्कांची तसेच उपलब्ध विधी सहाय्याची माहिती देण्यात येत असल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. ‘न्याय सर्वांसाठी’ या संकल्पनेनुसार कायदेविषयक माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version