Spread the love

कानबाई माता विसर्जन सोहळ्यात सौ. ममता पाटील यांचा उत्स्फूर्त सहभाग

डोक्यावर कानबाई मातेची मूर्ती घेत पारंपरिक फुगड्यांत सहभाग; शेतकरी सुख-समृद्धीसाठी प्रार्थना, जीपीएस महिला मित्र परिवाराच्या सामाजिक कार्याचा निर्धार

पाळधी | प्रतिनिधी :
खानदेशच्या लोकसंस्कृतीचे आणि पारंपरिक श्रद्धेचे प्रतीक असलेल्या कानबाई माता उत्सवाला पाळधी येथे उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. विविध कानबाई माता मंडळांच्या विसर्जन सोहळ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या पत्नी सौ. ममता प्रतापराव पाटील यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डोक्यावर कानबाई मातेची मूर्ती घेत त्यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदविला. यावेळी महिलांसोबत पारंपरिक फुगडी खेळत त्यांनी उत्सवाचा आनंदही घेतला.

कानबाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शेतकरी बांधवांना सुख-समृद्धी लाभावी, भरघोस पीक यावे तसेच सर्वांचे आरोग्य व कल्याण व्हावे, यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे महिला वर्गात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

पाटील कुटुंबीयांचा उत्सवात सहभाग

नामदार गुलाबराव पाटील हे मुंबईतील कामकाजामुळे मुंबईत असल्याने, तर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे मतदारसंघातील विविध कामांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या कुटुंबातील महिलांनी पाळधीतील कानबाई माता उत्सवात सहभाग घेतला. गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबातील दोन्ही सुनांनी गावातील विविध कानबाई माता मंडळांना भेटी देऊन मातेचे दर्शन घेतले.

सौ. ममता पाटील यांनी महिला व ग्रामस्थांमध्ये सहजपणे मिसळून संवाद साधला. पारंपरिक उत्सवात सर्वसामान्य महिलांप्रमाणे सहभागी होत त्यांनी आपुलकीचा परिचय दिला.

जीपीएस महिला मित्र परिवार सामाजिक कार्यासाठी सज्ज

जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर जीपीएस महिला मित्र परिवाराची स्वतंत्र व भक्कम वाटचाल सुरू करण्याचा निर्धार सौ. ममता पाटील यांनी व्यक्त केला.

“जीपीएस मित्र परिवार ज्या पद्धतीने समाजाच्या सुख-दुःखात धावून जात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे, त्याचप्रमाणे जीपीएस महिला मित्र परिवारातील महिलाही खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्य करण्यासाठी सज्ज आहेत,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

महिलांना केवळ उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता आरोग्य, महिला सक्षमीकरण, गरजू कुटुंबांना मदत आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांत सक्रिय सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

साधेपणातून आपुलकीचा संदेश

नामदारांची सून किंवा माजी जिल्हा परिषद सदस्यांची पत्नी अशी कौटुंबिक ओळख असतानाही सौ. ममता पाटील यांचा साधेपणा आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा स्वभाव कानबाई माता उत्सवाच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवला. महिलांसोबत फुगडी खेळणे, विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणे आणि ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधणे यामुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कानबाई माता उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबत खानदेशी संस्कृती, महिला एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. जीपीएस मित्र परिवाराच्या सामाजिक कार्याला आता महिला शक्तीची साथ मिळणार असून, महिला सहभागातून आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version