Spread the love

३३ वर्षांची परंपरा कायम; कानिफनाथ गडावर २७ ऑगस्टला महाप्रसादाचे आयोजन

नगरसेवक अँड. प्रसन्न जगताप यांच्या पुढाकारातून धार्मिक उपक्रम; कॉलेजच्या काळातील २०० रुपयांच्या वर्गणीतून सुरू झालेल्या भंडाऱ्याचे आज भव्य स्वरूप

पुणे | प्रतिनिधी : एस. एन. नांदेडकर 
पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगाव येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक अँड. प्रसन्न जगताप यांच्या पुढाकारातून गेल्या अनेक वर्षांपासून हा धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.

या महाप्रसादाची तब्बल ३२ वर्षांची अखंड परंपरा असून, यंदा या उपक्रमाचे ३३ वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाच्या महाप्रसाद सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

२०० रुपयांच्या वर्गणीतून सुरू झाला भंडारा

महाप्रसादाच्या या उपक्रमाची सुरुवात कॉलेज जीवनात मित्रपरिवाराच्या माध्यमातून झाली होती. प्रत्येक मित्राने आपापल्या परीने थोडी-थोडी रक्कम जमा करून अवघ्या २०० रुपयांच्या वर्गणीतून पहिला भंडारा आयोजित केला होता. त्या छोट्याशा उपक्रमाने पुढे मोठे रूप घेतले आणि आज हा महाप्रसाद सोहळा धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकीचे प्रतीक बनला आहे.

श्रावणात लाखो भाविकांची उपस्थिती

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा, या उद्देशाने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

यंदाच्या महाप्रसाद सोहळ्यासाठी परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक अँड. प्रसन्न जगताप यांनी केले आहे.

३३ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या उपक्रमातून धार्मिक श्रद्धेसोबतच सेवा, सामाजिक बांधिलकी आणि सामूहिक सहभागाची परंपरा जपली जात असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version