पळासखेडे रुपनगरमध्ये कडक पोलीस बंदोबस्तात अधिकाराचा ठराव
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासोतील वातावरण तप्त; १३ विरुद्ध ७ मतांनी प्रेमराज पवार यांच्या नावाचा ठराव मंजूर
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये मतदानाच्या अधिकारासाठी ठराव करण्यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पळासखेडे रुपनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रस्सीखेचीनंतर अखेर आज कडक पोलीस बंदोबस्तात ठराव करण्यात आला.
वादळी चर्चेनंतर झालेल्या सभेत १३ विरुद्ध ७ मतांनी नियमित कर्जफेड करणारे सभासद प्रेमराज सूर्यभान पवार यांच्या नावाचा मतदानाच्या अधिकारासाठी ठराव मंजूर करण्यात आला. ठरावाच्या वेळी सभासदांमध्ये जोरदार चर्चा झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध कार्यकारी सोसायट्यांकडून मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी संबंधित सभासदाच्या नावाचा ठराव करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. पळासखेडे रुपनगर येथेही याचे पडसाद उमटले. सोसायटीतील काही सदस्य सहलीला गेल्याने गावातील वातावरण अधिकच तप्त झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भडगाव पोलिसांकडून सभेच्या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ठराव कशासाठी?
पळासखेडे रुपनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची कर्जवसुली १०० टक्के नसल्यामुळे निवडून आलेल्या सभासदांना जिल्हा बँक निवडणुकीत मतदानासाठी त्यांच्या नावाचा ठराव करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदाच्या नावाचा ठराव करून त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळेच संबंधित सोसायटीमध्ये ठरावावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती.
सभेला सोसायटीचे चेअरमन प्रमोद कृष्णा पाटील, संचालक शरद पाटील, ज्ञानेश्वर राजपूत, ताराचंद पवार, पांडुरंग जाधव, धनंजय पवार, संगीताबाई पाटील, सखुबाई पाटील, दीपक मोरे, राहुल पाटील, हरी वंजारी यांच्यासह सभासद उपस्थित होते.
सचिवांनी बजावली निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची भूमिका
सभेच्या वेळी संस्थेचे सचिव संतोष चंदले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना संस्थेचे शिपाई लक्ष्मण पाटील यांनी सहकार्य केले.
कडक पोलीस बंदोबस्त
ठरावाच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशील सोनवणे यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप परदेशी, संजय पाटील, सुनील राजपूत, दीपक पाटील, सोनी सपकाळे तसेच होमगार्ड समाधान देशमुख, अजय पाटील, किशोर पाटील, रवींद्र महाजन, शरद काळे, युवराज राठोड आणि पोलीस पाटील ज्ञानेश्वर कोळी यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सोसायट्यांमधील मतदानाच्या अधिकारासाठी सुरू झालेल्या हालचालींमुळे आगामी काळात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
