सरपंच तथा प्रशासक श्री. पुंडलिक सपकाळे यांच्या पुढाकाराने ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी सदिच्छा भेट
सरपंच तथा प्रशासक पुंडलिक सपकाळे यांच्या पुढाकाराने उपक्रम; प्रेम, आपुलकी आणि सामाजिक सलोख्याचा जागर
जळगाव प्रतिनिधी : जगदिश सपकाळे
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त कानळदा गावात हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश देणारा उपक्रम उत्साहात पार पडला. सरपंच तथा प्रशासक पुंडलिक सपकाळे यांच्या पुढाकाराने गावातील मुस्लिम बांधवांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत गावातील मुस्लिम बांधवांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शुभेच्छा स्वीकारताना मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि आपलेपणाची भावना दिसून आली. या सदिच्छा भेटींमुळे परस्परांतील प्रेम, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला.
ही केवळ सणाच्या शुभेच्छांची भेट न राहता माणुसकीच्या नात्याला अधिक घट्ट करणारा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची भावना जपणारा विधायक उपक्रम ठरला. गावातील विविध समाजघटकांनी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत सामाजिक एकतेची परंपरा अधिक मजबूत करण्याचा संदेश यानिमित्ताने दिला.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती बोरोले, जगदीश सपकाळे, किशोर सपकाळे तसेच जितेंद्र सपकाळे, प्रल्हाद न्हावकर, तुषार विसपुते सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कर्मचारी कांतीलाल सपकाळे, योगेश भंगाळे आणि नामदेव धनगर यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला.
गावातील सामाजिक एकता आणि परस्पर सौहार्द वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच, सण वेगळे असले तरी आनंद एकच आणि गाव म्हणजे प्रेम, एकता व बंधुभावाने जोडलेले एक कुटुंब’, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची ही भावना सदैव कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
