Spread the love

वनविभागाच्या जमिनीवर मक्याच्या आड गांजाची शेती; थाळनेर पोलिसांचा छापा

९३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ३७४ किलो गांजा जप्त; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी फरार

शिरपूर, धुळे | प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वनविभागाच्या जमिनीवर मक्याच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. थाळनेर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत गांजाची शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत ३७४ किलो गांजा, अंदाजे ९३ लाख ५० हजार रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्र खुमसिंग पावरा (रा. महादेव, ता. शिरपूर) याच्याविरुद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मक्याच्या पिकाच्या आड गांजाची लागवड

शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरातील जमाईपाडा या अतिदुर्गम भागात वनविभागाच्या जमिनीवर मक्याच्या पिकाच्या आड गांजाची शेती करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पथक तयार केले आणि संबंधित ठिकाणी छापा टाकला.

कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ही शेती उद्ध्वस्त करून ३७४ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ९३ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

गांजा लागवडीचे नेटवर्क शोधण्याची मागणी

शिरपूर तालुक्यात यापूर्वीही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गांजाची शेती उद्ध्वस्त करण्याच्या अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरात अमली पदार्थांची बेकायदेशीर लागवड नेमकी किती प्रमाणात सुरू आहे, याचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे.

वनविभागाच्या जमिनीवर अशा प्रकारे अमली पदार्थांची लागवड होत असल्याने पोलीस, वनविभाग आणि कृषी विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण व कारवाई करून बेकायदेशीर गांजा लागवड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल पाटील, पोलीस अंमलदार चतरसिंग खसावद, उमाकांत वाघ, विजय पाटील, अनिकेत साळुंखे, विनोद पावरा, रवींद्र कोकणी, आकाश साळुंखे, केशव जाधव, कैलास महाजन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे देवेंद्र ठाकूर, गुलाब पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version