बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस उत्साहात व शांततेत संपन्न
ठिकठिकाणी गोड भात, गोड शिरा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था; पोलिसांचा चोख बंदोबस्त
बिडकीन | प्रतिनिधी : जॉन भालेराव
सालाबादप्रमाणे यंदाही बिडकीन शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि शांततेत पार पडला. बुधवारी सकाळी ८ वाजता नुरानी मस्जिद येथे कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर मदिना मस्जिद, बसस्थानक येथून जुलूस काढण्यात आला. जुलूसमध्ये शहरातील नागरिक, तरुण तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विविध मार्गांवरून जुलूसाची मिरवणूक
मदिना मस्जिद बसस्थानक येथून निघालेला जुलूस सादत चौक, हवालदार गल्ली, बागवान गल्ली, बिडकीन ग्रामपंचायत, बसस्थानक आणि शेकटा फाटा मार्गे पुन्हा नुरानी मस्जिद येथे पोहोचला. याठिकाणी जुलूसाची सांगता करण्यात आली.
जुलूसाच्या मार्गावर ठिकठिकाणी गावातील तरुणांच्या वतीने सहभागी नागरिकांसाठी गोड भात, गोड शिरा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्य मिनाजभाई ईनामदार यांच्या वतीने जुलूसात सहभागी नागरिकांना फेटे बांधण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नातख्वानांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने नाशिक येथील नातख्वान सय्यद शहबाज रजा आणि सय्यद अब्दुल रहमान यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
जुलूसाच्या नियोजनासाठी नुरानी मस्जिद कमिटी आणि मदिना मस्जिद कमिटी यांच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. धार्मिक वातावरणासोबतच शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले.
मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज पाटील पेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तमिजुद्दीन ईनामदार, पंचायत समिती सदस्य लतीफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य मेहमुद शहा, कौसर मिर्झा, काझी मुनिरोददीन, सय्यद असलम, आसिफ पठाण, शौकत सय्यद, शौकत पठाण, आजम शेख, फेरोज शेख, सद्दाम ईनामदार, अफसर शेख, लियाकत पठाण, जाहीर पठाण, अख्तर शहा, शेख अनसर सर, फेरोज ईनामदार, शफीक शेख, गौस सय्यद, महेबुब पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच मौलाना निजाम ईनामदार, मौलाना तारिक अन्वर, हाफिज आमीर, हाफिज वसीम, हाफिज इम्रान खान, फारुख सय्यद, शेख शब्बीरभाई, हाफिज ईनामदार, सद्दाम पटेल आणि अनिस पठाण यांच्यासह बिडकीन शहरातील सर्व स्तरातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
जुलूस शांततेत पार पडावा, यासाठी बिडकीन पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे संपूर्ण जुलूस शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने बिडकीन शहरात दिवसभर उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले.
