नाडगाव-सोनोटी रस्त्याची दुरवस्था; १५ दिवसांत काम न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा
दहा वर्षांपासून रस्ता खड्डेमय; विद्यार्थ्यांसह वाहनचालक त्रस्त, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीच्या डांबरीकरणाची मागणी
बोदवड | प्रतिनिधी :
तालुक्यातील नाडगाव ते सोनोटी रस्त्याची गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सोनोटी येथील रहिवासी सुनील सुभाष बोदडे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बोदवड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंजुरीनंतरही काम रखडले
निवेदनानुसार, नाडगाव-सोनोटी रस्ता सन २०२४ पासून मंजूर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे विद्यार्थ्यांची बस वेळेवर येत नसल्याचे तसेच अनेकदा बससेवाही उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे बोदडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
वारंवार मागणी करूनही दुर्लक्षाचा आरोप
रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप सुनील बोदडे यांनी केला आहे. मोठा अपघात घडण्याची प्रतीक्षा न करता प्रशासनाने तातडीने रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
१५ दिवसांचा अल्टिमेटम
येत्या १५ दिवसांत नाडगाव-सोनोटी रस्त्याची समस्या मार्गी न लागल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर परिसरातील नागरिकांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा सुनील बोदडे यांनी निवेदनातून दिला आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीची दखल घेऊन रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात करतो, याकडे नाडगाव, सोनोटी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
