म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाचा मार्ग मोकळा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
२५ कोटींचा प्रकल्प आता ४५.८२ कोटींचा; वाढीव २०.८२ कोटींच्या निधीचा मार्ग मोकळा — ७० टक्के काम पूर्ण
पाळधी/जळगाव | प्रतिनिधी, दि. २६ :
जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०२० मध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाला २५ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. आतापर्यंत पुलाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी निधी अपुरा पडत असल्याने सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती.
गेल्या सहा महिन्यांपासून शासनस्तरावर सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, या प्रकल्पाची सुधारित किंमत आता ४५ कोटी ८२ लाख रुपये झाली आहे. त्यामुळे मूळ मंजूर रकमेच्या तुलनेत २० कोटी ८२ लाख रुपयांच्या वाढीव खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे.
व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रस्तावासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १९ ऑगस्ट रोजी संबंधित विभागाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा प्रशासकीय टप्पा पूर्ण झाला आहे.
रेल्वे फाटकाचा रोजचा खोळंबा सुटणार
म्हसावद व परिसरातील नागरिकांसाठी हा उड्डाणपूल केवळ दळणवळणाचा प्रकल्प नसून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासाशी जोडलेला महत्त्वाचा दुवा आहे.
रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर वाहनांच्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा, वाहतुकीचा खोळंबा तसेच शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना होणारा विलंब, हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या समस्येपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
‘निधीअभावी प्रकल्प रखडू नये यासाठी पाठपुरावा’
याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, म्हसावद परिसरातील शेतकरी व नागरिकांचा रेल्वे फाटकावरील रोजचा खोळंबा कायमचा कमी व्हावा, या उद्देशाने उड्डाणपुलाला मंजुरी मिळवून देण्यात आली. सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर केवळ निधीअभावी प्रकल्प रखडू नये, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
वाढीव खर्चाचा मार्ग मोकळा झाल्याने आता उर्वरित कामाला गती देऊन उड्डाणपूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतमाल वाहतुकीलाही मिळणार चालना
उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर म्हसावदसह परिसरातील गावांची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. विशेषतः शेतमालाची वाहतूक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाचा लाभ मिळणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
