Spread the love

संभाजीनगर भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारणार!

वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश; मनपा सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर, चारही बाजूंना व्यापारी संकुल उभारण्याचीही योजना

संभाजीनगर | प्रतिनिधी :

संभाजीनगर शहरात भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेत प्रस्ताव मांडून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मनपाच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे.

भीमनगर परिसरातील आरक्षित जागेवर विजयस्तंभ

प्रभाग क्रमांक ३ मधील भीमनगर, भावसिंगपुरा आणि निसर्ग कॉलनी परिसरातील महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मनपा सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका तथा प्रभाग सभापती करुणा मेघानंद जाधव यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला. त्यानंतर वंचितचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगळ यांनी या मागणीला पाठिंबा देत विषय पुन्हा सभागृहात मांडला.

विजयस्तंभ शौर्य आणि अस्मितेचे प्रतीक

भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा केवळ एक स्मारक नसून शौर्य, स्वाभिमान, संघर्ष आणि अस्मितेचे प्रतीक असल्याची भावना प्रस्तावातून व्यक्त करण्यात आली. विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्याची मागणी नागरिकांच्या भावनेशी जोडलेली असून, त्यातून ऐतिहासिक स्मृती जपण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान तसेच नगरसेविका जरीना जावेद कुरेशी यांनीही प्रस्तावाला पाठिंबा दिला.

व्यापारी संकुलामुळे मनपाच्या उत्पन्नात भर

विजयस्तंभाच्या चारही बाजूंना व्यापारी संकुल उभारण्याची संकल्पनाही प्रस्तावात मांडण्यात आली आहे. त्यामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच महानगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

‘वंचित जनतेच्या विश्वासाला जागतोय’

जनतेने दिलेल्या संधीचा उपयोग वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी करण्याचा प्रयत्न सुरू असून, भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीस मंजुरी मिळणे हे त्याच पाठपुराव्याचे यश असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

शहरात विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आता प्रत्यक्ष बांधकामाला कधी सुरुवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version