Spread the love

शिंदेंच्या मंत्र्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला!

मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांना वर्षभर ‘मायमराठी’ला फाट्यावर मारण्याची मुभा

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील अमराठी टॅक्सी आणि रिक्षाचालकांना जुजबी संवादात्मक मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. शिवाय, या वर्षभराच्या कालावधीत त्यांच्यावर शासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असा मोठा दिलासाही दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवल्याने त्याबाबत आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. सरनाईक मराठी सक्तीच्या मुद्द्यावर अत्यंत आग्रही आणि आक्रमक होते. मात्र, भाजपचा अमराठी मतदार वर्ग नाराज होण्याची शक्यता तसेच आगामी उत्तर प्रदेश निवडणुका हे यामागील प्रमुख कारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे आणि सरनाईक यांच्यासाठीही हा मोठा धक्का असून यामुळे महामुंबईतील मराठी माणूस नाराज होण्याची शक्यता आहे.

हाजी अराफत यांच्या नेतृत्त्वाखालील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शासनाच्या या नियमाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. मात्र, चालकांच्या वयातील भिन्नतेमुळे भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ देण्याची विनंती केली होती. चालकांच्या या सकारात्मक प्रतिसादाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही सवलत जाहीर केली असून, या एका वर्षाच्या वाढीव काळात संघटना स्वतः पुढाकार घेऊन चालकांसाठी मराठी भाषेचे विशेष वर्ग आयोजित करून त्यांना भाषा शिकवणार आहेत. या महत्त्वाच्या निर्णयामुळे हजारो अमराठी चालकांचा रोजगार सुरक्षित राहण्यासोबतच, प्रवाशांशी संवाद सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मराठी भाषेचे ज्ञान विनादबाव आत्मसात करण्यासाठी त्यांना आता योग्य अवधी मिळाला आहे, असे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Share.
Leave A Reply

Exit mobile version