रक्षाबंधनच्या पर्वावर न्यू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ ईस्ट जळगावच्या वतीने सायकलीची अनोखी भेट
१३ गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप; शैक्षणिक प्रवास सुकर करण्याचा स्तुत्य उपक्रम
नशिराबाद | प्रतिनिधी :
रक्षाबंधनाच्या पर्वावर न्यू इंग्लिश स्कूल, नशिराबाद येथील १३ गरजू विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ ईस्ट जळगावच्या वतीने सायकलींची अनोखी भेट देण्यात आली. शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थिनींचा वेळ वाचावा आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लबच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
यापूर्वीही शाळेतील गरजू विद्यार्थिनींना रोटरी क्लबच्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू तसेच आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक नसलेल्या विद्यार्थिनींची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. सायकलींची भेट मिळाल्याने विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
रोटरी क्लबचे सदस्य कल्पेश छेडा यांनी रक्षाबंधनाच्या पर्वावर विद्यार्थिनींना ही सायकल भेट देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच रोटरी क्लबचे सदस्य संजय गांधी यांनी विद्यार्थिनींनी सायकलींचा वापर प्रामुख्याने शैक्षणिक कामासाठी करावा, असे आवाहन केले. सायकलचा वापर झाल्यानंतर ती विकण्याऐवजी अन्य गरजू विद्यार्थिनीला देऊन या मदतीची साखळी पुढे सुरू ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
१३ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
या उपक्रमांतर्गत प्रतीक्षा भोई, पायल राठोड, जानवी नाथ, चेतना माळी, ज्ञानेश्वरी कुंभार, यशस्वी पाटील, तेजल सोळंके, कोमल सोनवणे, तृप्ती गोसावी, दिपाली बारीला, भुवनेश्वर मानकरी, प्रज्ञा पगारे आणि समृद्धी इंगळे या विद्यार्थिनींना सायकली भेट देण्यात आल्या.
या सायकलींमुळे विद्यार्थिनींचा शाळेत ये-जा करण्याचा वेळ वाचण्यास मदत होणार असून, त्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी होण्यास हातभार लागणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ. मनोज चौधरी, सेक्रेटरी पूजा अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन प्रीतम मुनोत, तसेच धीरज काबरा, नितेश जैन, कल्पेश छेडा, कौशल लोढा यांच्यासह नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव मधुकर चौबे, संचालक विनायक वाणी, राजेश पाटील, जनार्दन माळी, ॲड. प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका एस. ए. बनसोडे, उपमुख्याध्यापक ए. डी. चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे यांच्यासह सायकल भेट मिळालेल्या विद्यार्थिनींचे पालकही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाचपांडे सर यांनी केले, तर आभार जी. टी. पाटील यांनी मानले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
