Spread the love

कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

परभणी, दि. २८ | प्रतिनिधी : रामचंद्र अन्नदाते

राज्यातील युवक-युवतींना कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे.

परभणी जिल्ह्यातही स्थानिक गरजा लक्षात घेऊन किमान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत विविध प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे युवक-युवतींना कौशल्य आत्मसात करून रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये डेअरी प्रोसेसर, शेळीपालन, रेशीम उद्योग, शिलाई मशीन प्रशिक्षण, चर्मकार प्रशिक्षण, जिनिंग मशीन फिटर, हापसा/हातपंप दुरुस्ती (प्लंबर), शेळी व मेंढीपालन, नीडल क्राफ्ट ऑफ बंजारा/बंजारी आणि सोलार क्षेत्रातील प्रशिक्षण आदी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

महिलांना विशेष प्राधान्य

प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी लाभार्थ्यांची निवड करताना किमान ५० टक्के लाभार्थी महिला असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच एकल महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांसह ग्रामीण भागातील युवक-युवतींनाही रोजगारक्षम कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

प्रशिक्षण केंद्रांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

दरम्यान, स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत तसेच संलग्नता व मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रे आणि प्रशिक्षण प्रदात्यांनी परभणी जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यासाठीचे प्रस्ताव ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, परभणी येथे सादर करावेत.

जिल्ह्यातील युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित प्रशिक्षण केंद्रे व प्रशिक्षण प्रदात्यांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र, परभणी यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version