भुजरीया पर्वानिमित्त कांचन नगरात कुशवाह राजपूत समाजाची भव्य रॅली; DJच्या तालावर जल्लोष
पारंपरिक भुजऱ्यांचे पूजन; समाजातील महिला, युवक-युवतींसह बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव | प्रतिनिधी :
कुशवाह राजपूत समाजाच्या वतीने भुजरीया पर्वानिमित्त पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कांचन नगर परिसरात झालेल्या या सोहळ्याला समाजातील माता-भगिनी, युवक-युवती तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक उत्साह, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक एकतेचा संदेश देत हा उत्सव आनंदात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने भुजऱ्यांचे पूजन करण्यात आले. यानंतर कांचन नगर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. DJच्या तालावर समाजबांधवांनी जल्लोष केला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला व युवक-युवती तसेच हातात भुजऱ्या घेऊन सहभागी झालेल्या समाजबांधवांमुळे रॅलीला विशेष शोभा आली.
भुजरीया पर्वाच्या माध्यमातून कुशवाह राजपूत समाजाची पारंपरिक संस्कृती, रूढी-परंपरा आणि सामाजिक मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला. या उत्सवाच्या निमित्ताने समाजातील एकोपा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कुशवाह राजपूत बहुउद्देशीय संस्था, जळगावचे अध्यक्ष जगदीश सुभाष राजपूत, उपाध्यक्ष दीपक राजपूत तसेच संस्था कार्यकारिणी आणि समस्त कुशवाह राजपूत समाजबांधवांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
भुजरीया पर्वाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून ‘एकता, संस्कृती, परंपरा आणि समाजसेवा’ या मूल्यांचा जागर करण्यात आला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत नव्या पिढीपर्यंत ती पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
जय भवानी! जय राजपूताना!
