Spread the love

शेलवडच्या शाळा इमारतीचा प्रश्न चिघळला; उपोषणाचा पाचवा दिवस

गटशिक्षणाधिकारी अनिता परमार यांची उपोषण सोडण्याची विनंती; ‘काम सुरू होईपर्यंत माघार नाही’ अशी उपोषणकर्त्यांची भूमिका

बोदवड | प्रतिनिधी :
शेलवड येथील बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, शाळेची इमारत बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. प्रशासनाकडून उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली असली तरी, प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, गटशिक्षणाधिकारी अनिता परमार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, यापूर्वीही शाळेच्या इमारत बांधकामाबाबत सन २०१७ मध्ये १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी आश्वासन देण्यात आले होते. असे असतानाही अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नाही, असा मुद्दा उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे’

वारंवार आश्वासने मिळूनही शाळेच्या इमारतीचे काम मार्गी लागले नसल्याने आता केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. “जोपर्यंत शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शेलवड येथील विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज शाळेची इमारत उभी राहावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

उपोषणाला पाच दिवस उलटूनही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ व पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. आता प्रशासन या प्रश्नावर कोणती ठोस भूमिका घेते आणि शाळेच्या इमारत बांधकामाला प्रत्यक्ष कधी सुरुवात होते, याकडे शेलवड ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version