अमळनेर तालुका क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप सैंदाणे; प्रकाश बोरसे जिल्हा उपाध्यक्ष
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वावर मोठी जबाबदारी; नियुक्तीपत्र देऊन जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
अमळनेर (प्रतिनिधी) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर आणि जळगाव जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील यांच्या आदेशानुसार अमळनेर तालुका व जळगाव जिल्हा कार्यकारिणीतील महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अमळनेर तालुका अध्यक्षपदी संदीप बबनराव सैंदाणे (भैय्यासाहेब), तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश बोरसे यांची बिनविरोध व बहुमताने निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संदीप सैंदाणे हे स्वतः शेतकरी असून शेतकरी, कष्टकरी आणि बळीराजाच्या विविध प्रश्नांची त्यांना प्रत्यक्ष जाण आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच अन्यायाविरोधात त्यांनी यापूर्वीही विविध आंदोलने आणि लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ, जिव्हाळा आणि संघर्षाची भूमिका लक्षात घेऊन संघटनेने त्यांच्यावर अमळनेर तालुक्याच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली आहे.
प्रत्यक्ष शेतकरी असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बांधावर उतरून संघर्ष करणाऱ्या सैंदाणे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने स्थानिक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि संघटनेची तालुक्यातील बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रकाश बोरसे यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्हास्तरावरही संघटनेच्या कामाला बळ मिळणार आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक व्यापक पातळीवर आंदोलने व जनजागृती करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बोरसे, तालुका अध्यक्ष संदीप सैंदाणे यांच्यासह विजय पाटील, मनोज पाटील ठाकूर तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
