Spread the love

महात्मा फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; “खेळामुळे खिलाडूवृत्ती निर्माण होते” — क्रीडाशिक्षक एच. डी. माळी

धरणगाव, प्रतिनिधी : अजय बाविस्कर : धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेचे क्रीडाशिक्षक एच. डी. माळी यांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा कारकिर्दीची तसेच त्यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले, “खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते. नियमित खेळामुळे आरोग्य उत्तम राहते आणि आनंदी व निरोगी जीवन जगण्यास मदत होते.”

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये व्हॉलीबॉल, क्रिकेट, लिगोरी आणि कबड्डी आदी खेळांचा समावेश होता. विविध खेळांमधून विद्यार्थ्यांनी उत्साह, शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर व्ही. टी. माळी यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version