Spread the love

कानळदा जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीचा उत्स्फूर्त सहभाग; ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’चा संदेश

जळगाव प्रतिनिधी जगदिश सपकाळे : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्या स्वच्छता अभियानाच्या संदेशाने प्रेरित होऊन कानळदा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले.

या अभियानात गावाचे सरपंच पुंडलिक सपकाळे, शाळेचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांनी एकत्रितपणे शाळेचा परिसर, मैदान, वर्गखोल्यांच्या आजूबाजूचा परिसर तसेच परिसरातील कचरा साफ करून स्वच्छता केली.

यावेळी ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा आणि निरोगी शाळा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच शाळा आणि गावाचा परिसर कायम स्वच्छ ठेवण्याची सवय लागावी, यासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे, असे आवाहन केले. मुख्याध्यापक व शिक्षकांनीही विद्यार्थिनींना स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले.

या स्वच्छता अभियानामुळे शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर झाला. ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्या एकजुटीतून राबविण्यात आलेले हे अभियान सामाजिक सहभागाचे उत्तम उदाहरण ठरले. अभियानाचे ग्रामस्थ व पालकांकडून कौतुक करण्यात आले.

‘स्वच्छता हीच सेवा, स्वच्छ शाळा हीच सुंदर शाळा!’ या संदेशाने अभियानाची सांगता करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version