Spread the love

अवैध धंद्यांविरोधात ॲड. पंकज गोरे यांचा एल्गार; आंदोलनस्थळी नशेच्या पदार्थांचे प्रदर्शन

ॲड. असीम सरोदे यांची आंदोलनाला भेट; अवैध धंद्यांविरोधात न्यायालयीन लढ्यास सहकार्याचे आश्वासन

धुळे | प्रतिनिधी :
धुळे शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध धंद्यांना आणि नशेच्या पदार्थांच्या कथित वाढत्या विक्रीला आळा घालण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ॲड. पंकज गोरे यांनी सुरू केलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. २७ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनस्थळी विविध नशेच्या पदार्थांचे प्रदर्शन मांडून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

धुळे शहर व जिल्ह्यात सट्टा-मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गांजा, गुटखा तसेच इतर अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ॲड. गोरे यांनी केली आहे. या अवैध धंद्यांमुळे विद्यार्थी व तरुण पिढी चुकीच्या मार्गाकडे वळत असून, त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी आंदोलनादरम्यान सांगितले.

‘अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने?’

शहरातील सट्टा क्लब, पत्त्यांचे क्लब आणि एमडी ड्रग्जसह विविध नशेच्या पदार्थांची कथित विक्री सुरू असल्याचा आरोप करत हे प्रकार नेमके कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा सवाल ॲड. पंकज गोरे यांनी उपस्थित केला. बनावट दारू आणि नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या गुटख्याची धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचा आरोप करत, पोलिसांकडून कारवाई होत असली तरी या तस्करीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली.

ॲड. असीम सरोदे यांची आंदोलनस्थळी भेट

धुळ्यात आलेले सुप्रसिद्ध वकील तथा संविधान अभ्यासक ॲड. असीम सरोदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ॲड. पंकज गोरे यांच्याकडून आंदोलनाची माहिती जाणून घेतली. अवैध धंद्यांविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याची वेळ आल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी धुळे जिल्ह्यातून विमल व गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याची माहिती ॲड. गोरे यांनी सरोदे यांना दिली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी संवाद साधून तातडीने कारवाईची मागणी करणार असल्याचे ॲड. सरोदे यांनी सांगितले.

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि विविध संघटनांचा पाठिंबा

आंदोलनाला पहिल्या दिवसापासून सर्वसामान्य नागरिक तसेच विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. तिसऱ्या दिवशी आग्रा रोड हॉकर्स युनियनचे रोडगाडीधारक, ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.

धुळे जिल्हा अवैध धंदे व गुन्हेगारीमुक्त करून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ॲड. पंकज गोरे यांनी दिला आहे.

यावेळी तेजस गोटे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, पंकज भारस्कर, सागर साळवे, दिलीप चित्ते, सूरज भावसार, संदीप चौधरी, कार्तिक पाटील, संजय पाटील, विनोद रनमले, प्रवीण मुर्तडक, मनोज गवळी, बंटी गोरे, आप्पा लहामगे, गोपी सोनार, विशाल ढेकळे, गणेश पाखले, स्वप्नील सोनवणे, सौरभ जवराल यांच्यासह विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक, रोडगाडीधारक व टपरीधारक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version