वृक्षांना राखी बांधून रामजी नगर शाळेत अनोखे रक्षाबंधन
‘झाडे आमचे रक्षण करतात, आम्ही झाडांचे रक्षण करू’; विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची शपथ
सोयगाव प्रतिनिधी :
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाला पर्यावरण संवर्धनाची भावनिक जोड देत तालुक्यातील रामजी नगर येथील जिल्हा परिषद शाळेत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
वृक्षांना राखी बांधताना विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष हेच आपले खरे भाऊ’ अशी भावना व्यक्त केली. तसेच ‘झाडे आमचे रक्षण करतात, आम्ही झाडांचे रक्षण करू’ अशी पर्यावरण संवर्धनाची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगणारी विविध घोषवाक्ये सादर केली. वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाप्रती प्रेम, जिव्हाळा व जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरला. वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला.
या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
