Spread the love

पारोळा शेतकरी सहकारी संघाच्या विकासाला नवी झेप!

प्रशासकीय इमारत व १५० हून अधिक व्यापारी संकुलांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते भव्य भूमिपूजन

पारोळा : प्रतिनिधी (संदीप पाटील)

पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुलाच्या महत्त्वाकांक्षी बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा लोकप्रिय आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकरी बांधवांना आधुनिक व सक्षम सुविधा उपलब्ध करून देतानाच पारोळा शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात तीन मजली अत्याधुनिक इमारत, शेतकरी सहकारी संघाची प्रशासकीय कार्यालये, १५० हून अधिक व्यापारी संकुले, शेतकरी निवास आणि विविध अत्याधुनिक सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असून, पारोळा शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात या माध्यमातून होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

१०८ संस्था आणि ७ हजारांहून अधिक व्यक्ती सभासद

सन १९१६ मध्ये स्थापन झालेल्या पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघाला मोठी ऐतिहासिक व गौरवशाली परंपरा लाभली आहे. संघाचे पहिले अध्यक्ष स्व. आण्णासाहेब केशवराव चंदारकर पाटील, तर पहिले उपाध्यक्ष स्व. दादासाहेब बळवंतराव दौलतराव पाटील होते.

सहकारमहर्षी माजी आमदार मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली संघाने शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबविले. सन १९८६-८७ पासून आजतागायत सभासद, संस्था प्रतिनिधी, शेतकरी बांधव तसेच माता-भगिनी यांनी सातत्याने विश्वास दाखवत संघाची सत्ता एकहाती शिवसेनेच्या ताब्यात दिल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ज्वारी खरेदीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

सहकारमहर्षी मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारोळा शेतकरी सहकारी संघाने संपूर्ण महाराष्ट्रात ज्वारी खरेदीत प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला. तब्बल १ लाख ११ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी करून संघाने प्रथम पारितोषिकही मिळविले. शेतकरी हितासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळे संघाने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र व भक्कम ओळख निर्माण केली आहे.

आधुनिक सुविधांमुळे शेतकरी-व्यापाऱ्यांना मोठा लाभ

आजच्या घडीला संघाचे १०८ संस्था सभासद आणि सुमारे ७ हजार ३०६ व्यक्ती सभासद आहेत. हजारो शेतकरी कुटुंबांचा विश्वास संपादन केलेल्या या संस्थेची विकासाची वाटचाल आता अधिक वेगाने आधुनिकतेच्या दिशेने सुरू आहे. नव्या प्रशासकीय इमारतीसह व्यापारी संकुलाच्या उभारणीमुळे पारोळा शहराच्या वैभवात निश्चितच भर पडणार असून, रोजगार व व्यापाराच्या संधींनाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या भूमिपूजन सोहळ्यास संघाचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद, शेतकरी बांधव, व्यापारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version