Spread the love

धानोरा येथे धानोरेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात!

पारंपरिक बैलगाडी मिरवणुकीने वेधले लक्ष; भक्तिमय वातावरणात अभिषेक व महाप्रसाद

जळगाव : प्रतिनिधी (शैलेश गुरव)

जळगाव तालुक्यातील धानोरा येथे ग्रामस्थांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या श्री धानोरेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाचा जीर्णोद्धार व विशेष अभिषेक पूजन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण धानोरा गावात दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्या संस्कृती व परंपरेला उजाळा देत आकर्षक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीतून शिवलिंगाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

पाच जोडप्यांचा अभिषेक पूजनात सहभाग

या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री. सुधाकर खुशाल पाटील, निंबा गोविंदा पाटील आणि हितेश निंबा पाटील यांनी केले होते. विशेष अभिषेक व पूजनाच्या विधीमध्ये पाच जोडप्यांनी सहभाग घेतला.

यावेळी ईश्वर भगवान पाटील, शैलेश निंबा पाटील, सागर ज्ञानेश्वर धनगर आणि दिलीप धोंडू पाटील यांच्या हस्ते मुख्य पूजा विधी पार पडला. मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

आबालवृद्धांसह महिलांची मोठी उपस्थिती

शिवलिंगाच्या जीर्णोद्धार सोहळ्यासाठी धानोरा गावातील आबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला.

ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण धानोरा नगरी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने शिवमय झाली होती. पारंपरिक बैलगाडी मिरवणूक आणि भक्तिमय वातावरणामुळे या सोहळ्याने गावातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला उजाळा मिळाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version