Spread the love

पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करू द्या; स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा

बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन; पथविक्रेत्यांच्या हक्कांसह वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी एल्गार

जळगाव :
पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी द्यावी तसेच ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष पथविक्रेते आणि वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांकडे वेधण्यात आले.

स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा

कारवाईच्या नावाखाली पथविक्रेत्यांचा छळ थांबविण्याची मागणी

जळगावसह राज्यातील अनेक पथविक्रेते रस्त्याच्या कडेला भाजीपाला, फळे व इतर वस्तू विकून उदरनिर्वाह करतात. मात्र अतिक्रमण विभाग व प्रशासनाकडून वारंवार कारवाई करून त्यांच्या मालाची नासधूस केली जाते तसेच माल जप्त केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

पथविक्रेत्यांच्या जप्त केलेल्या मालाबाबत कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करून त्यांचा माल परत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. पथविक्रेत्यांना सन्मानजनक उपजीविकेपासून वंचित ठेवू नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

पथविक्रेता अधिनियम २०१४ आणि महाराष्ट्र नियम २०१५ यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण, अधिकृत प्रमाणपत्र आणि व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

“स्मार्ट मीटरची सक्ती नको”

वीज ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिले येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

स्मार्ट मीटर आणि जुन्या डिजिटल मीटरची सहा महिने समांतर मोजणी करण्यात यावी, प्रत्यक्ष मीटर रीडिंगशिवाय अंदाजे वीजबिल देऊ नये तसेच ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवू नये, अशी मागणी करण्यात आली.

दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी व घरगुती ग्राहकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

  • पथविक्रेता अधिनियम २०१४ व महाराष्ट्र नियम २०१५ यांची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करावी.
  • ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेले नाही, त्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे.
  • पथविक्रेत्यांना व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात यावे.
  • पथविक्रेत्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करून सन्मानजनक उपजीविकेचा हक्क अबाधित ठेवावा.
  • जप्त केलेला पथविक्रेत्यांचा माल त्यांना परत करण्यात यावा.
  • पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी.
  • ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये.
  • स्मार्ट मीटर व जुने डिजिटल मीटर सहा महिने समांतर मोजणीसाठी ठेवावेत.
  • प्रत्यक्ष मीटर रीडिंगशिवाय अंदाजे वीजबिले देऊ नयेत.
  • दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी व घरगुती ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आंदोलनानंतर बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव शहराध्यक्ष श्रुषी भारसके, उपाध्यक्ष राकेश भोई, जळगाव तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे आणि भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवानंद निकम यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांना निवेदन सादर केले.

या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल देहडे आणि जिल्हा सचिव खुशाल सोनवणे यांनी केले.

आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रा. एन. व्ही. भारंबे, डॉ. मच्छिंद्र पाटील, अमोल कोल्हे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ. शाकीर शेख, अकीलभाई कासार, अकील पहलवान, सावरकर रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पथविक्रेते, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्रालयावर महामोर्चाचा इशारा

पथविक्रेते आणि वीज ग्राहकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यापुढील टप्प्यात मंत्रालयावर लाखो पथविक्रेत्यांचा विशाल महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी सुमित्र अहिरे आणि राज्य अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांनी दिला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version