संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे यांची सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
चाळीसगावात महात्मा फुले स्मारकाला अभिवादन; डॉ. कोल्हे यांना ‘गुलामगिरी’ ग्रंथ भेट देत ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिकेच्या प्रचार-प्रसाराबाबत चर्चा
धरणगाव प्रतिनिधी – वाल्मिक पाटील
धरणगाव : महाराष्ट्रभूषण तथा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे सध्या ‘वारसा मराठी’ या यूट्यूब चॅनेलवरील भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेत राष्ट्रपिता सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका प्रभावीपणे साकारत आहेत.
या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. अमोल कोल्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. कोल्हे यांचे पुष्पगुच्छ तसेच महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ हा ऐतिहासिक ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिकेच्या प्रचार-प्रसाराबाबत चर्चा
या भेटीदरम्यान ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ या ऐतिहासिक मालिकेच्या प्रचार आणि प्रसाराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा ऐतिहासिक मालिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जळगाव जिल्ह्याच्या वतीने या मालिकेच्या प्रसारासाठी शक्य तेवढे अर्थसहाय्य व सहकार्य करण्याचे आश्वासन सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
यावेळी सामाजिक कार्यकर्ते धर्मराज पुंडलिक पाटील, महाराष्ट्र प्रभारी सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील, उपाध्यक्ष कैलास जाधव, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भगवान बोरसे, एरंडोल येथील सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन, प्रा. पंकज पाटील, पद्मिनी माळी, हेमांगी महाजन यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचा प्रभावी प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
