वनविभागाच्या जमिनीवर गांजाची शेती उद्ध्वस्त; ८२.५० लाखांचा ३३० किलो गांजा जप्त
कपाशी-तुरीच्या पिकाआड ‘पुष्पा स्टाईल’ गांजा लागवड; एकास अटक, साथीदार फरार
शिरपूर, धुळे :
शिरपूर तालुक्यातील चिलारे परिसरात वनविभागाच्या जमिनीवर कपाशी आणि तुरीच्या पिकामध्ये करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलिसांनी उद्ध्वस्त केली. पोलिसांनी कारवाईत ८२ लाख ५० हजार रुपये किमतीचा सुमारे ३३० किलो गांजा जप्त केला असून, या प्रकरणी दीपक अभिमान पावरा (वय ४२, रा. चितारे, शिरपूर) याला ताब्यात घेतले आहे. त्याचा एक साथीदार मात्र फरार झाला आहे.
तीन दिवसांत गांजाविरोधात दुसरी मोठी कारवाई
शिरपूर तालुक्यात तीन दिवसांपूर्वीच थाळनेर पोलिसांनी सुमारे ९३ लाख रुपये किमतीची गांजाची शेती उद्ध्वस्त केली होती. ही कारवाई ताजी असतानाच शिरपूर तालुका पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई करून गांजाची शेती उद्ध्वस्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अल्पावधीत दोन मोठ्या कारवाया झाल्याने “शिरपूर तालुका गांजा शेतीचा हब बनतोय का?” असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
दुर्गम भागातील वनजमिनीवर गांजाची लागवड
शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चिलारे परिसरात वनविभागाच्या जमिनीवर गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी विविध पथके तयार केली. त्यानंतर चिलारे परिसरात छापा टाकून कपाशी व तुरीच्या पिकामध्ये लपवून करण्यात आलेली गांजाची लागवड शोधून काढण्यात आली. पोलिसांनी गांजाची झाडे व तयार गांजा असा मोठा मुद्देमाल जप्त करत शेती उद्ध्वस्त केली.
पूर्वीही मोठ्या कारवाया; गांजामुक्त तालुक्याची मागणी
शिरपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून जिल्हा पोलीस दलासह मुंबईतील पथकांकडूनही गांजाच्या अवैध लागवडीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात अशा प्रकारची लागवड नेमकी किती प्रमाणात आहे, याचा सखोल शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या कारवाया सुरू असतानाच जिल्हा पोलीस दल, वनविभाग आणि कृषी विभागाने संयुक्त पथक तयार करून तालुक्याचे सखोल सर्वेक्षण करावे आणि शिरपूर तालुका गांजामुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
