धुळे जिल्ह्यातील गुटखा रॅकेट कधी उध्वस्त करणार?
तरुणांचे आरोग्य वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा; शिवसेना उबाठाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
धुळे : धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सर्रासपणे सुरू असलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखू, मावा व इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्करीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुटखा रॅकेटच्या मुळाशी जाऊन कारवाई करावी, अशी मागणी करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
यावेळी “धुळे जिल्ह्यातील गुटखा रॅकेट कधी उध्वस्त करणार?” असा थेट सवाल शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. गुटख्याची सर्रास विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी निवेदनासोबत गुटख्याचे पाकीटही पोलीस प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तरुणांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न
धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गुटखा, सुगंधित तंबाखू, मावा तसेच इतर प्रतिबंधित व व्यसनजन्य पदार्थांची अवैध तस्करी, साठवणूक आणि विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या अवैध व्यवसायामुळे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नसून तरुण पिढीच्या आरोग्यावर आणि कुटुंबांच्या आर्थिक व सामाजिक जीवनावरही गंभीर परिणाम होत असल्याचे शिवसेना उबाठाने म्हटले आहे.
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, ओरल सबम्युकोस फायब्रोसिस (OSMF), तोंड उघडण्याची क्षमता कमी होणे तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे गुटख्याचा प्रश्न हा केवळ अवैध व्यवसायाचा नसून सार्वजनिक आरोग्य आणि भावी पिढीच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“थातूरमातूर कारवाई नको, तस्करांच्या मुळाशी पोहोचा”
गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात वेळोवेळी कारवाई होत असली तरी अवैध पुरवठा करणारी साखळी, मोठे साठे, वाहतूकदार, वितरक आणि प्रमुख पुरवठादार यांच्यावर अपेक्षित कठोर व सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
“तात्पुरती कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. गुटखा तस्करांच्या मुळाशी पोहोचून संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. वर्षभर पुरेल इतका साठा तस्करांनी करून ठेवला असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावे,” अशी मागणी करण्यात आली.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आवाहन
धुळे जिल्ह्यातील खासदार, पालकमंत्री, आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या आरोग्यासाठी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवसेना उबाठाने केले आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध साखळी उद्ध्वस्त करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
“आम्हाला राजकारण करायचे नाही”
“या प्रश्नाचे राजकारण करायचे नाही. कोणत्याही निरपराध व्यक्तीला लक्ष्य करायचे नाही किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीविरुद्ध व्यक्तिगत मोहीम उभी करायची नाही. आमची एकच मागणी आहे—धुळे जिल्ह्यातील गुटखा व प्रतिबंधित व्यसनजन्य पदार्थांची अवैध साखळी मुळापासून उद्ध्वस्त करा,” अशी भूमिका शिवसेना उबाठाने मांडली.
प्रशासनाकडून प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण कारवाई न झाल्यास नागरिकांच्या लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारण्याचा अधिकार राखून ठेवत असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
“गुटखा माफियांच्या दबावापेक्षा नागरिकांचे आरोग्य मोठे”
“गुटखा माफियांच्या दबावापेक्षा धुळेकर नागरिकांचे आरोग्य मोठे आहे. अवैध व्यवसायांच्या आर्थिक हितसंबंधांपेक्षा तरुणांचे भविष्य मोठे आहे आणि राजकीय स्वार्थापेक्षा जनतेचे हित मोठे आहे. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन प्रशासनावर कारवाईसाठी दबाव आणावा,” असे आवाहन शिवसेना उबाठाच्या वतीने करण्यात आले.
या वेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, निंबा मराठे, भरत मोरे, अण्णा फुलपगारे, दिलीप चित्ते, राजू ढवळे, शेखर वाघ, शिवाजी शिरसाळे, युवा सेनेचे कुणाल कानकाटे, मनोज जाधव, महिला आघाडीच्या अरुणा मोरे, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, सुनीता वाघ, प्रभादेवी परदेशी, ज्योती वानखेडे, कपिल लिंगायत, महादू गवळी, दिनेश पाटील, मुन्ना पठाण, निलेश कांजरेकर, गोकुळ बडगुजर, जयेश फुलपगारे, इश्तियाक अंसारी, तरबेज शेख, वैभव पाटील, अविनाश जोंधळे, राजू पाटील, नितीन पाटील, तालुका प्रमुख भैय्या पाटील, मोहनसिंग परदेशी आदी उपस्थित होते.
— धीरज पाटील
शिवसेना महानगर प्रमुख
