Spread the love

जळगाव शहर पोलिसांची मोठी कामगिरी: अवघ्या ५ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस, तिघे ताब्यात, १२,००० रुपये हस्तगत

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्स येथे ६२ वर्षीय नागरिकाच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या संशयितांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले. या कारवाईत दोन प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांकडून चोरीच्या रकमेपैकी १२ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान फिर्यादी अनिल राजमल कासट (वय ६२, रा. म्हाडा कॉलनी, एमआयडीसी, जळगाव) हे शाहू कॉम्प्लेक्स येथे असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १२ हजार ५०० रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या माहितीने आरोपी जेरबंद

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी विशेष गुन्हे शोध पथक तयार केले.

पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयितांचा माग काढला. त्यानंतर गेंदालाल मिल परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये शहीदखान नजीरखान (वय २७, रा. गेंदालाल मिल, जळगाव), समीर खान मजीदखान (वय ३७, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.

चौकशीत चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर दोन्ही प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी १२,००० रुपये रोख हस्तगत करण्यात आले.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सागर शिंपी, जीपीएसआय सुनील पाटील, सफौ दीपक शिरसाट तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version