Spread the love

विमुक्त जाती-भटक्या जमातींनी शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान व स्वयंरोजगारातून प्रगती साधावी

ग्रामपंचायत कानळदा येथे VJNT समाजातील प्रतिनिधींना मार्गदर्शन; सरपंच पुंडलिक सपकाळे यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी जगदिश सपकाळे : विमुक्त जाती व भटक्या जमाती दिनानिमित्त ग्रामपंचायत कानळदा यांच्या वतीने गावातील VJNT प्रवर्गातील विविध समाजांच्या प्रतिनिधींना ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षण, सामाजिक सन्मान, विकास, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि पारंपरिक व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन समाजाने प्रगतीच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी केले.

कार्यक्रमात बोलताना सरपंच पुंडलिक सपकाळे म्हणाले की, विमुक्त जाती व भटक्या जमातींचा इतिहास हा संघर्षाचा आणि कष्टाचा आहे. या समाजातील बांधवांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या पारंपरिक कला, कौशल्य आणि व्यवसाय जपले आहेत. आजच्या काळात या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि बाजारपेठेची जोड दिल्यास रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात.

“सहानुभूतीपेक्षा संधी आणि आश्वासनांपेक्षा अधिकारांची माहिती समाजाला आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे स्पष्ट केले. समाजातील प्रत्येक मुला-मुलीने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. महिलांच्या सक्षमीकरणावरही सरपंच सपकाळे यांनी विशेष भर दिला. महिलांनी बचत गटांमध्ये सहभागी होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, स्वयंरोजगार व लघुउद्योगांकडे वळावे आणि ग्रामविकासाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

युवकांनी कौशल्य विकास, डिजिटल तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा, रोजगार व उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा. पारंपरिक व्यवसाय आधुनिक पद्धतीने विकसित करून त्यांना बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच युवकांनी व्यसनांपासून दूर राहून “व्यसनमुक्त युवक, सक्षम कुटुंब आणि समृद्ध गाव” हा संकल्प करण्याचे आवाहन केले.

ग्रामपंचायत ही केवळ मूलभूत सुविधा पुरवणारी संस्था नसून गावातील प्रत्येक घटकाच्या विकासाची जबाबदारी घेणारी लोकशाहीची स्थानिक संस्था आहे. गावातील VJNT समाजातील पात्र कुटुंबांना शासकीय योजना, शैक्षणिक सुविधा, आवश्यक कागदपत्रे, घरकुल, रोजगार व कौशल्य विकासाच्या योजनांची माहिती मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे सरपंचांनी सांगितले.

“गावाचा विकास तेव्हाच खरा विकास म्हणता येईल, जेव्हा गावातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचेल,” असा निर्धार व्यक्त करत कानळदा गावातील कोणतेही कुटुंब विकासापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहील, असे सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, समानता, स्वाभिमान, महिला सक्षमीकरण, युवकांचा विकास, व्यसनमुक्ती आणि सामाजिक एकता यांचा संदेश देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती बोरोले, भिकन सपकाळे,विक्की राणे,अशोक कणखरे,प्रकाश भोई,संजय भोई, गोकुळ कणखरे, निलेश लांबोळे,नाना शिंदे, सागर शिंदे, गोविंदा शिंदे, समाजातील प्रतिनिधी, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version