Spread the love

नाहाटा महाविद्यालयात ‘रानभाजी महोत्सवा’चे आयोजन

‘ओळख, आरोग्य आणि पाककला’ कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध रानभाज्यांपासून रुचकर पाककृतींची मेजवानी

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रानभाजी महोत्सव – ओळख, आरोग्य आणि पाककला’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रानभाज्यांची ओळख, त्यांचे आरोग्यदायी महत्त्व तसेच त्यापासून तयार होणाऱ्या विविध पाककृतींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

पावसाळ्यात, विशेषतः श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून, त्या आपल्या आहारासाठी वरदान ठरतात. शरीरासाठी आवश्यक असलेल्या विविध पोषक घटकांचा खजिना रानभाज्यांमध्ये असतो. त्यामुळे रानभाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असून, त्यांच्या पारंपरिक पाककृती विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांकडून तसेच कुटुंबातील ज्येष्ठांकडून शिकून घ्याव्यात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ. बऱ्हाटे यांनी बालपणी खाल्लेल्या दोडी, अळूची वळी आणि कटूर्ले या रानभाज्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच वनस्पतीशास्त्र विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विभागाचे कौतुक केले.

रानभाज्यांच्या पाककृतींची मेजवानी

रानभाजी महोत्सवानिमित्त विविध रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या पाककृतींचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध रानभाज्यांपासून तयार केलेल्या रुचकर पाककृती प्रदर्शनासाठी आणल्या.

उंबर, सराटा, पानांचा ओवा, शेवगा, आघाडा, अंबाडी, चिवळ, अळू, कटूर्ले आदी विविध रानभाज्यांपासून विद्यार्थ्यांनी आकर्षक व चविष्ट पाककृती तयार केल्या. यासोबतच संबंधित रानभाज्यांची शास्त्रीय नावे, त्यांचे उपयोग, आरोग्यविषयक महत्त्व तसेच पाककृतीची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. उपस्थितांनी विविध पाककृतींचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील इतर विषयांच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे रानभाज्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच पारंपरिक आहारपद्धतींचे महत्त्व अधोरेखित झाले.

कार्यशाळेस प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सौ. विद्या पाटील, प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एम. जे. जाधव यांच्यासह महाविद्यालयातील विविध विषयांचे प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी रानभाज्यांची माहिती जाणून घेत त्यांच्या पाककृतींचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस.वाय.बी.एस्सी.चा विद्यार्थी शोएब अन्सारी याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी व मायक्रोबायोलॉजी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version