Spread the love

धुळ्यात शनिवारी रंगणार उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी!

फाईट ग्रुपचा भव्य आयोजन; पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन, दहीहंडीतून ‘सर्वधर्मसमभावा’चा संदेश

धुळे प्रतिनिधी : धुळे शहरात शनिवारी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फाईट ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते नाना साळवे यांच्या पुढाकारातून पारोळा रोड परिसरातील प्रकाश टॉकीज चौकात शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता या भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

या दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार असून, आमदारांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे धुळे शहरात या उत्सवाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दहीहंडीतून सर्वधर्मसमभावाचा संदेश

धुळे शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात दहीहंडीचे आयोजन करण्यात येत असून, या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते नाना साळवे यांनी सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे फाईट ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.

भव्य आयोजनाची जय्यत तयारी

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवासाठी फाईट ग्रुपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांसाठी तसेच सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

कार्यक्रमाला मोठी गर्दी अपेक्षित असल्याने आयोजनस्थळी आवश्यक त्या तयारीवर भर देण्यात आला आहे.

राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या भव्य दहीहंडी सोहळ्यास पालकमंत्र्यांसह आमदार, खासदार, महापौर, पोलीस दलातील अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन फाईट ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

फाईट ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नाना साळवे, विजय अहिरे, पप्पू पगारे, मनोज पारेराव, गोविंदा गरुड, सुमित शिंदे, लड्डू शिंदे, विनय अहिरे, राहुल साळवे, अमोल झालर, योगेश पाटील यांच्यासह फाईट ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version