Spread the love

वीजबिल वसुलीस गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला!

दांडक्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न; खांद्यावर वार बसल्याने फ्रॅक्चर — महावितरणच्या पथकाला जिवे मारण्याची धमकी

धुळ्यात ८ जणांविरोधात विविध १४ कलमांन्वये गुन्हा; तब्बल ५ तासांच्या ठिय्यानंतर मध्यरात्री एफआयआर दाखल

धुळे प्रतिनिधी : वीजबिलाच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला करून एका तंत्रज्ञाला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारात बुधवारी (दि. २ सप्टेंबर) सायंकाळी घडली. वीजपुरवठा खंडित करून स्मार्ट मीटर बसविण्याच्या कारवाईदरम्यान वाद निर्माण झाला आणि त्यानंतर कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी सागर पाटील, आकाश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगेश (पूर्ण नाव अज्ञात) तसेच चार अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध १४ कलमांन्वये धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थकबाकी वसुलीसाठी गेले होते पथक

महावितरणकडून सध्या थकीत वीजबिलांच्या वसुलीची मोहीम सुरू आहे. त्यानुसार फागणे उपविभागाचे सहायक अभियंता प्रवीण भामरे, आशिष कासार, प्रधान तंत्रज्ञ रविंद्र चौधरी, तंत्रज्ञ चंद्रकांत पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ इंद्रजित नाईक आणि बाह्यस्रोत तंत्रज्ञ रूपेश पाटील हे पथक बाळापूर शिवारातील हॉटेल शांतीसागरजवळील साईसागर ग्रेनाईट मार्बल दुकानावर गेले होते.

संबंधित ग्राहकाकडे साडेसहा हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल थकीत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

स्मार्ट मीटर बसविण्यावरून वाद

पथकाने वीजबिल भरण्याची सूचना केल्यानंतर दुकानातील योगेश नावाच्या व्यक्तीने मालक बाहेर गेल्याचे सांगून ते परत आल्यानंतर बिल भरतील, असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, महावितरणच्या नियमांनुसार जुना मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तंत्रज्ञ चंद्रकांत पाटील यांनी वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर स्मार्ट मीटर कंपनीचे प्रतिनिधी मीटर बदलण्याच्या तयारीत असतानाच दुकानाचे मालक सागर पाटील, आकाश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील वाहनातून तेथे आले.

‘लाईन कोणी बंद केली?’ म्हणत वादाला सुरुवात

फिर्यादीनुसार, दुकानात आल्यानंतर सागर पाटील यांनी वीजपुरवठा कोणी बंद केला, अशी विचारणा केली. त्यानंतर योगेशने चंद्रकांत पाटील यांच्याकडे बोट दाखवल्याने वाद वाढला.

फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे की, त्यानंतर काही व्यक्तींनी चंद्रकांत पाटील यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पुढे आणखी काही व्यक्ती तेथे आल्या आणि त्यांनी हाताबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

लाकडी दांडक्याने हल्ल्याचा आरोप

मारहाणीदरम्यान एका अनोळखी व्यक्तीने दुकानाच्या बाजूला पडलेला जाड लाकडी दांडका उचलून चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी वार चुकविल्याने दांडक्याचा फटका त्यांच्या उजव्या खांद्यावर बसला. ते खाली कोसळल्यानंतर महावितरणच्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली आणि त्यांना तातडीने श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाल्याचे सांगण्यात आले.

‘पुन्हा लाईट कट करायला आलात तर जिवंत सोडणार नाही’

महावितरणच्या पथकाला शिवीगाळ आणि मारहाण करण्यासोबतच पुन्हा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी आलात तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

५ तास ठाण मांडल्यानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल

घटनेनंतर संबंधितांकडून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायदेशीर कारवाईवर ठाम राहिल्याचे सांगण्यात आले.

गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांसह ७ अभियंते आणि ८ तांत्रिक कर्मचारी धुळे तालुका पोलीस ठाण्यात सुमारे पाच तास उपस्थित होते. त्यानंतर रात्री १२.१६ वाजता एफआयआर दाखल करण्यात आला.

८ जणांविरोधात १४ कलमांन्वये गुन्हा

सहायक अभियंता प्रवीण भामरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), १३२, १२१(१), १२१(२), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१), ३७(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत असून, मारहाणीत सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख आणि घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी तपासली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version