पाचोऱ्यात झोक्यात झोपलेल्या एक वर्षाच्या बालकाचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू
पहिल्या वाढदिवसानंतरच काळाने हिरावले चिमुकल्याचे प्राण; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
पाचोरा : (किशोर रायसाकडा)
शहरातील कृष्णापुरी परिसरातील सारोळा रोड भागात झोक्यात झोपलेल्या अवघ्या एक वर्षाच्या बालकाचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी घडली. संघर्ष राहुल पाटील असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. तो सैनिक राहुल बाप्पुराव पाटील यांचा मुलगा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी संघर्ष याला नेहमीप्रमाणे घरातील झोक्यात झोपविण्यात आले होते. तो डोक्यातून खाली घरंगळून पडू नये म्हणून त्याच्या पोटाला झोक्यावर आवरण बांधण्यात आले होते. मात्र, झोक्याच्या पायथ्याकडे सरकत असताना पोटाला बांधलेले आवरण त्याच्या गळ्याजवळ आले आणि त्याला गळफास बसला. काही वेळाने आईने झोक्याकडे पाहिले असता हा प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने संघर्षला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
चिमुकल्याच्या मृत्यूची बातमी समजताच आईसह नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रविवारीच संघर्षचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता, अशी माहिती मिळाली. पहिला वाढदिवस साजरा झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
