‘बहिणाबाई म्हणजे साहित्याचं विद्यापीठ होय’ — प्रा. मनोज पाटील
बहिणाबाई चौधरी जयंतीनिमित्त कला व विज्ञान महाविद्यालयात विविध उपक्रम
कोळगाव : “बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यात ग्रामीण सण-उत्सव, निसर्ग, परंपरा, माहेर-सासर, ग्रामीण लग्नसोहळे, चालीरीती, उखाणे अशा विविध विषयांचा समावेश आहे. ग्रामीण जीवनातील हे सर्व पैलू त्यांच्या काव्यातून सहजपणे उमटले आहेत. त्यामुळे बहिणाबाई म्हणजे साहित्याचे विद्यापीठच होय,” असे प्रतिपादन मराठी विभागप्रमुख प्रा. मनोज पाटील यांनी केले.
तात्यासाहेब हरी रावजी पाटील शिक्षण सहकारी संस्था, भडगाव संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, कोळगाव येथे खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुरेश आनंदा कोळी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. मनोज पाटील यांनी बहिणाबाईंच्या अहिराणी भाषेतील निसर्गकविता, ‘खोप्यामधी खोपा’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘मन वढाय वढाय’ या प्रसिद्ध काव्यपंक्तींसह शेतकरी, शेती, माती आणि निसर्गाशी असलेले नाते याविषयी मार्गदर्शन केले. बहिणाबाईंच्या साहित्यामधून खान्देशातील ग्रामीण जीवन, संस्कृती, परंपरा आणि निसर्गाचे अत्यंत प्रभावी चित्रण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एम. टी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनीषा बोरसे यांनी केले, तर आभार प्रा. प्रशांत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे करण्यात आले. यावेळी प्रा. मनोज पवार, प्रा. प्रविणा पाटील, प्रा. राहुल सोनवणे, प्रा. दिनकर सूर्यवंशी, प्रा. तुषार पाटील, श्रीकांत हिरे, तेजस पवार, चेतन पाटील यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
