Spread the love

कानळदा येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बँकिंग सुविधा, डिजिटल व्यवहार, सायबर फसवणूक, विमा व पेन्शन योजनांबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी जगदिश सपकाळे :  भारतीय रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या सहकार्याने तसेच अॅक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, दिल्ली संचालित मनीवाइज सेंटर फॉर फायनान्शियल लिटरसी, जामनेर ब्लॉक, जळगाव यांच्या अंतर्गत कानळदा येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला व बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जळगाव विभागातील एलडीओ श्री. आकर्षण अविनाश यांनी बँकिंग लोकपाल, ग्राहकांचे हक्क व विविध बँकिंग सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी व महिला बचत गटांसाठी उपयुक्त असलेल्या विविध आर्थिक योजनांची माहिती त्यांनी दिली.

अकोला विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. आकाश मेहेत्रे यांनी सायबर गुन्हे व ऑनलाइन आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करत त्यांनी सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे महत्त्व अधोरेखित केले.

कानळदा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे बँक व्यवस्थापक श्री. अभिलाष वाघ यांनी डिजिटल पेमेंट, विमा, पेन्शन, बचत व गुंतवणूक याबाबत नागरिकांना माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), अटल पेन्शन योजना (APY) आदी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अमळनेर केंद्राचे केंद्र व्यवस्थापक श्री. सुनील भील यांनी सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी RSETIच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत कानळदाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य श्री. जगदीश सपकाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. भिकन सपकाळे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील भाऊ गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या व अडचणी मांडल्या. सामाजिक कार्यकर्ते श्री. रविभाऊ मोरे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे नियोजन CFL जामनेरचे केंद्र व्यवस्थापक श्री. साहेबराव सुरवाडे व जळगावचे एफसी श्री. दर्पण मोरे यांनी केले. यावेळी विविध बचत गटांतील सीआरपी सदस्य, महिला, ग्रामस्थ तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आर्थिक शिस्त, सुरक्षित डिजिटल व्यवहार, बचत, विमा, पेन्शन व गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा आर्थिक साक्षरता कार्यक्रमांचे महत्त्व मोठे आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना विविध शासकीय व बँकिंग योजनांची माहिती मिळून त्याचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, ग्रामस्थ, महिला व बचत गटांच्या सदस्यांचे CFL सेंटर टीमच्या वतीने आभार मानण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version