नशिराबादच्या मुख्य प्रवेशद्वाराला परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव
नामफलकाचे उत्साहात अनावरण; नशिराबादकरांमध्ये आनंद आणि अभिमानाचे वातावरण
नशिराबाद : शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव देण्यात आले असून, त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करणाऱ्या नामफलकाचे उत्साहपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. या निर्णयामुळे तमाम नशिराबादकरांमध्ये आनंद, समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहराच्या प्रवेशद्वारावर परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव झळकल्याने नशिराबादला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. महाराजांचे कार्य, विचार आणि समाजाला दिलेली प्रेरणा यांची आठवण या नामफलकाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांपर्यंत जपली जाणार आहे. त्यांच्या पावन स्मृतींना ही एक कायमस्वरूपी आणि प्रेरणादायी आदरांजली ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पुढाकार घेऊन सकारात्मक भूमिका बजावल्याबद्दल नशिराबाद नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील, उपनगराध्यक्ष पंकज भाऊ महाजन, सर्व विभागांचे सभापती, सन्माननीय नगरसेवक-नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
नशिराबादच्या मुख्य प्रवेशद्वारावर आता परमपूज्य श्री झिपरू अण्णा महाराज यांचे नाव अभिमानाने झळकत असल्याने शहरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष या नामफलकाकडे वेधले जाणार आहे. महाराजांच्या स्मृती आणि विचारांना चिरंतन ठेवणारा हा निर्णय नशिराबादच्या इतिहासात निश्चितच महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
