Spread the love

मोठे वाघोदे येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शैक्षणिक कामकाजाचा आढावा; निपुण अभियान, पाठ नियोजन व शालेय पोषण आहारावर मार्गदर्शन

वाघोदा प्रतिनिधी | अक्षय वाघ : रावेर तालुक्यातील समूह साधन केंद्र कुंभारखेडा अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या परिषदेचे आयोजन जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, मोठे वाघोदे येथे करण्यात आले.

केंद्रप्रमुख श्री. मनोज माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत मागील महिन्यातील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांमध्ये विचारविनिमय करण्यात आला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रभावी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा झाली.

शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक श्री. रामेश्वर कांदे यांनी केले. उपस्थित केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बडगुजर यांनी केले.

परिषदेत विविध विषयांवर शिक्षकांनी सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये—

  • निपुण अभियान — श्री. मनोज महाजन, शाळा गौरखेडा
  • पाठाचे नियोजन — श्री. रमेश राठोड, शाळा चिनावल
  • शाळा व्यवस्थापन समिती व समुदाय सहभाग — श्री. विठ्ठल राजुरे, शाळा लोहारे बॉईज
  • राज्याचे धोरणात्मक व स्थानिक विषय — श्री. मुकेश पाटील, शाळा कुंभारखेडा

या विषयांवर मार्गदर्शक शिक्षकांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

विस्तार अधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक श्री. बखाल यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना शालेय पोषण आहार, निपुण भारत व पीजीआय या तीन प्रमुख विषयांवर सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण, परिणामकारक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक नियोजन, प्रभावी अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपक्रमांची नवी दिशा मिळाली.

कार्यक्रमास केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. सौ. वैशाली चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version